Sunday, August 7, 2016

साने गुरुजींचे स्वातंत्र्य विचार

सहज साधनाची वेबसाईट चाळताना मला साधनेच्या पहिल्या अंकातील साने गुरुजींचा लेख वाचनात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून एक वर्ष झाल्यानंतर साधना साप्ताहिकाचा जन्म झाला. पहिल्या स्वातंत्र्यदिनीच पहिलाच अंक प्रकाशित केल्यामुळे साहजिकच देशाच्या स्वातंत्र्यावर यामध्ये संपादकीय लेख आहे. साने गुरुजींनी स्वातंत्र्य म्हणजे काय याचा विचार यामध्ये मांडला आहे. पण भारताला स्वातंत्र्य मिळूण सत्तरी गाठली तरी आपण साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य आणू शकलो नाही याची खंत वाटते.

स्वातंत्र्य म्हणजे संधी असे साने गुरुजी म्हणतात. विकासाची संधी प्रत्येकाला देण्यात यावी असे त्यांना वाटत होते. प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार द्यायला हवा. पण त्यांचा विचारातील संधी मिळू शकली नाही. सज्जन विचार नांदावेत असे त्यांना मनोमन वाटत होते. पण तसे घडले नाही. स्वातंत्र्य मिळाले फक्त इंग्रजी राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली. इतकाच बदल झाला. सत्ता बदलच झाला. फक्त व्यक्ती बदल झाला. असेच म्हणावे लागेल. लाच घेण्याचे प्रकार वाढले. राजकिय नेत्यांची मनमानी वाढली. कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा. पण तसे घडले नाही. राजकत्यांच्या अरेरावीने हळूहळू स्वकियांची राजवट परकिय वाटू लागली. साने गुरुजींनी रामराज्याचे स्वप्न पाहिले होते. सध्या देशात सत्तेत असणाऱ्या सरकारनेही रामराज्य आणण्याची स्वप्ने आपणास दाखवली होती. रामाचे राज्य आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरुही असतील. पण ते त्यांच्यासाठीच एक आव्हान उभे राहीले आहे. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. त्यासाठी प्राणांची आहुती गेली तरी चालेल. विचार कधी मरत नाहीत. तो विचार जोपासणारे कोणी तरी उभे राहतेच. अखेर सत्याचाच विजय होतो. यासाठी लढत राहायला हवे. विचारांची चळवळ कधी संपत नाही. संधी देण्याचा विचार साने गुरुजींनी मांडला. पण संधीसाधूंचेच राज्य येथे आले. सध्या तर चांगल्या व्यक्तींनी राजकारणाची पायरीही चढू नये अशी स्थिती आहे. यावरुन संधी कोणाला मिळाली हे सांगण्याची मला येथे गरज वाटत नाही. पण स्वातंत्र्य म्हणजे संधी हा साने गुरुजींचा विचार लक्षात घेऊन मोदी सरकारने काम केल्यास रामराज्य आणणे शक्‍य आहे.

विकासाच्या संधी देऊन अहिंसक विचारांनी सरकारने काम केल्यास स्वातंत्र्यानंतर पाहिलेली स्वप्ने सत्यात आणणे शक्‍य आहे. सध्या आर्थिक दरी वाढली आहे. गरीब गरीबच होत आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होताना पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती सरकारने विचारात घेऊन पाऊले उचलायला हवीत. वाढती आर्थिक दरी देशासाठी घातक आहे याचा विचार करुन समानता आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल याचा विचार आता सरकारने करायला हवा. त्यावर चिंतन करायला हवे.
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी असेही साने गुरुजी म्हणतात. सरकारने आर्थिक समानता आणण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवे. लोकमानस ओळखून कामे करायला हवीत. भाषिक वाद वाढत आहेत. प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते. ती टिकवण्यासाठी त्याची धडपड सुरु असते. हा विचार करुन भाषेचे स्वातंत्र्य त्यांना द्यायला हवे. भाषेतून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलायला हवीत. विशेषतः सीमा भागात हा प्रश्‍न प्रकर्षाने जाणवत आहे. पण जनतेनेही संयम ठेऊन व्यवहार करायला हवेत. उगाच खोटी प्रतिष्ठा बाळगूण दुसऱ्यांना त्रास देणे योग्य होणार नाही. विकासासाठी राज्याचे तुकडे करणेही योग्य नाही. तुकडे केल्याने विकास साधता येईलही पण ते तुकडे एकमेकांशी भांडत राहतात याचाही विचार करायला हवा. एकत्र कुटूंब विभक्त झाले तर प्रत्येकाचा विकास होतो असे वाटते खरे पण विभक्त झाल्यानंतर विकासाच्या स्पर्धेतून वादही होतात. या वादातून नुकसानच अधिक होते याचाही विचार व्हायला हवा. भाऊ भावाचा खून करत आहे. राज्याचे तुकडे केल्यानंतर हे तुकडे एकमेकांशी भांडत राहणार याचाही विचार व्हायला हवा. सीमेचे वाद होतात, इंच इंच जमिनीसाठी वाद होतात. नोकरी, व्यवसायासाठी वाद होतात. लुट, हाणामाऱ्या वाढतात यातून विकास तो काय साधला जाणार हे ही विचारात घ्यायला हवे. यासाठी जबाबदारीने योग्य ती पाऊले उचलायला हवीत.

साने गुरुजींना स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे; स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, नैतिक भावना. असे वाटते. पण असा सतविचार घेऊन आपल्या देशातील कोणतेच सरकार आत्तापर्यंत काम करताना दिसले नाही. इतका सज्जनपणा दाखवणेही कोणाला जमले नाही. सज्जनपणाचे ढोंग करुन लुटारुंचे राज्य आपल्या देशात आले. चंगळवादाने देशाला पोखरले. मग याला स्वराज्य कसे म्हणायचे हाच मोठा प्रश्‍न आहे. कायदा कोणासाठी आहे हेच समजत नाही. राजकर्त्ये कायदा हातात घेऊन कामे करत आहेत. अशाने देशात शांती नांदेल असे कधीही शक्‍य नाही. पण स्वराज्यात सुराज्य आणणे शक्‍य आहे. हा विचार ठेऊन कामे केल्यास विषमता दुर करणे शक्‍य आहे. दुरावलेली मनेही जवळ आणणे शक्‍य होणार आहे. हा बदल केवळ समाजच घडवू शकतो. समाज विघातक कृत्ये करणारे एक टक्केही लोक नाहीत. सर्वच राज्यकर्त्ये वाईट आहेत असेही नाही. यासाठी समाजातील दहा टक्के लोकांनी एकत्र येऊन या एक टक्के लोकांना ताब्यात ठेवल्यास देशात रामराज्य आणणे शक्‍य आहे. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सरकार अशा संस्थांचा आवाज दाबत असेल तर त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही याचाही विचार व्हायला हवा. समाजाने अशांना धडा शिकवण्याची गरज आहे. पण आता कोण आवाज उठवणार. कोण चळवळ उभारणार. हे ही तिककेच महत्त्वाचे आहे. पण चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम सुरु केल्यास हे अशक्‍य नाही हे ही तितकेच खरे आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य देशात कसे नांदवता येईल याचा आता विचार होण्याची गरज वाटते.

- राजेंद्र घोरपडे 

Saturday, August 6, 2016

अभिषेक


चिमणगाव पंधरा हजार लोकवस्तीचा गाव. पुरातन मंदिरे ही गावाची ओळख. रामाने वनावसाच्या काळात येथे वास्तव्य केले होते. यामुळे या गावाला विशेष महत्त्व. वनवासाच्या काळातच देशात मोठा दुष्काळ पडला होता. सर्वत्र पाण्यासाठी ओरड सुरू होती. पाऊस पडावा दुष्काळ दूर व्हावा अशी
सर्वांची धारणा होती. पण देवाला याची दया येत नव्हती. अशावेळी चिमणगावातील जनतेने रामाकडे दुष्काळावर उपाय योजण्याची मागणी केली होती. लोकांचे होणारे हाल पाहून रामाने गावच्या डोंगरावर साधना केली व ब्रह्मास्त्राने येथे लिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. डोंगरावर मारलेल्या बाणाने येथे कायम स्वरूपी झरा निर्माण झाला. हा झरा दुष्काळातही कायम वाहत असतो. या पाण्यामुळे परिसरात कायम हिरवाई बहरलेली असते. या हिरवाईत चिमण्यांचा चिवचिवाट सतत ऐकायला मिळतो. यावरून येथे वसलेल्या या गावाला चिमणगाव असे नाव पडले, असेही येथील लोक सांगतात.
असे हे डोंगरकपारीत वसलेले चिमणगाव भक्तीचे केंद्र झाले आहे. शांत वातावरणामुळे आणि विविध गुहांमुळे साधनेसाठी अनेक भाविक येथे येतात. वड,
पिंपळासारखे मोठे वृक्ष, विविध वनौषिधींनी नटलेला हा परिसर पर्यटकांसाठी एक वेगळे आकर्षण आहे. कोण साधनेसाठी येथे येतो तर कोण मंत्रोच्चारासाठी येथे येतो.

दर सोमवारी येथे ॐ नमो शिवायः चा जप दिवस-रात्र होतो. मंत्रोच्चराच्या काळात अनेक भाविक येथील शंकराच्या मुर्तीवर व पिंडीवर दुधाचा अभिषेक घालतात. येथे दूध घातल्याने मन स्वच्छ होते असेही मानले जाते. मनातील सर्व अस्वच्छ विचारनाहीसे होतात. स्वच्छतेसाठीच अभिषेक असे त्याचे महत्त्व आहे. आता दुधा सोबत तांदूळही पिंडीवर टाकला जात आहे. या दूध, तांदळाचा सडाच पडलेला परिसरात
पहायला मिळतो. अभिषेकाच्या दुधाचा पाट शेवटी गटारीला मिळतो. याकडेही कोणाचे लक्ष नाही. यामुळे मंदिर परिसरात एक दुर्गंधी पसरली आहे तरीही याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. भक्तीच्या नावे अशुद्धता येथे होते आहे. असेही कोणाला वाटत नाही. शिव...शिव...करत दुसऱ्याचा स्पर्श झाला तरी घरात जाऊन अंघोळ करणाऱ्या भक्तांनाही अभिषेकाने पसरलेली दुर्गंधी दिसत नाही. मंदिर ऐतिहासिक असल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढतोच आहे. व्यापारी मात्र दूध, तांदळाचा व्यापार वाढविण्यावरच भर देत आहेत. पर्यटकांना दूध, तांदळाचे महत्त्व सांगून त्यांच्या गळी हा अभिषेक उतरवत आहेत. व्यापाऱ्यांच्या या फायद्याने ही ऐतिहासिक वास्तू गलिच्छ झाली आहे. याचेही भान कोणाला नाही. प्रशासनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. भाविकांच्या
भक्तीपुढे सारेच हतबल झाले आहेत. या दुर्गंधीने गावात डास पसरले. या डासांतूनच आता डेंगुची साथही गावातआली. साथीच्या रोगाचा प्रसार सतत होऊ लागला. आरोग्याच्या वाढत्या समस्यांमूळे या ठिकाणाचे पावित्र्य धोक्‍यात आले. रोगराईमुळे पाहता पाहता पर्यटकांचा ओघही घटला. व्यापाऱ्यांचा धंदा बुडाला. व्यावसायिकांचे उत्पन्न थांबले. सारा चिमणगावच ओस पडला. गावावर अवकळा आली. हे सर्व एका अभिषेकाने झाले.

या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलावण्यात आली. यामध्ये तरुण, सुशिक्षित - अशिक्षित सर्वच यामध्ये सहभागी झाले. अभिषेकामुळे ही दुर्गंधी पसरते यावर ग्रामसभेत एकमत झाले. पण अभिषेक बंद कोण करणार हा मोठा प्रश्‍न होता. यासाठी अभिषेकावर अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा असे ग्रामसभेत ठरले. तरुणांनी अभिषेकावर अभ्यास सुरू केला. अभिषेक दुधाचाच का? यावरही आता पुस्तके, ग्रंथ चाळले जाऊ लागले. एकात उत्तर मिळाले. दुधाने मुर्ती स्वच्छ होते. स्वच्छतेसाठी दुधाचा वापर केला जातो. मूर्ती स्वच्छ राहावी यासाठी अभिषेक घालण्यात येतो. पण काळाच्या ओघात ही गोष्ट लोक विसरले आहेत. फक्त स्वच्छ होण्यासाठी आवश्‍यक तेवढे दुध मूर्तीवर न ओतता. प्रमाणा बाहेर याचा वापर होऊ लागला आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणात वापरावी लागते. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाला तर त्याचा दुरुपयोग होतो. येथे हेच तर झाले आहे. हे तरुणांच्या लक्षात आले. अभ्यासातून काढण्यात आलेला निष्कर्ष अखेर ग्रामसभेत मांडण्यात आला. काही धर्मांध व्यक्तींनी हा निष्कर्ष मान्य केला नाही. याला विरोध दर्शिवला पण स्वच्छतेच्या प्रश्‍नी सर्वांनी पाठींबा दर्शिवला. ग्रामसभेत मंदिरातील इतर स्वच्छतेवरही चर्चा झाली. मूर्तीवर तांदूळ टाकले जातात. मंदिरा बाहेर नारळ फोडण्यात येतो. त्यातील पाणीही वाया जाते. या पाण्यानेही परिसरात अस्वच्छता होत आहे. येणारे पर्यटक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. वेफर्स, कुरकुरेच्या तयार पॅकेटमुळेही प्लास्टिकचा कचरा परिसरात होत आहे. या अशा अस्वच्छतेच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला. देवाचे मंदिर हे पवित्र ठिकाण. अशा परिसरात अस्वच्छता योग्य नाही. कोणताही धार्मिक विधी हा स्वच्छ आचार, विचारासाठी असतो. स्वच्छतेचा विचार, मन शुद्धीचा विचार सांगणारे हे ठिकाण अस्वच्छ असणे योग्य नाही. यासाठी स्वच्छता, शुद्धी
हेच अध्यात्म जोपासण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला. मंदिरात स्वच्छतेसाठी विविध उपाय योजना करणाचे ठरले. यात मुख्य म्हणजे अभिषेकामुळे होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी अभिषेक बंद करण्यात झाला. मूर्तीच्या स्वच्छतेसाठी आवश्‍यक तेवढेच दूध अभिषेकासाठी वापरून उरलेले दूध संकलित करण्याचा निर्णय झाला. हे संकलित झालेले दूध गरजूंना, वृद्धश्रमांना, अनाथांना देण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले. तरुण मंडळांनी याकामी पुढाकार घेतला. मूर्तीवर टाकण्यात येणारे तांदूळही गोळा केले जाऊ लागले. तेही अनाथ आणि वृद्धाश्रमांना देण्याचा निर्णय झाला. नारळ फोडल्यानंतर त्याचे टाकून देण्यात येणारे पाणीही गोळा करून मंदिरात येणाऱ्या भाविकांना वाटण्याचे ठरले. प्लास्टिकचा वाढता कचरा विचारात घेऊन प्लास्टिक
वापरावर मंदिर परिसरात बंदी घालण्यात आली. या सर्व कामांसाठी गावातील तरुण मंडळे पुढे आली. देवस्थानच्या विेशस्तांनीही याकामी पुढाकार घेतला. श्रावणातील पहिल्या सोमवारी याची अंमलबजावणी करण्याचे ठरले. यासाठी जनतेचे प्रबोधन करणारे फलक जागोजागी लावण्यात आले.
नेहमीप्रमाणे श्रावणातल्या या सोमवारीही दर्शनासाठी गर्दी झाली. येणाऱ्या भाविकांचे प्रबोधन करणे हे मोठे आवाहन तरुण मंडळा समोर होते. कोणी उद्धट उत्तरे देत होते. कोणाला हा विचार पटला नाही. त्यांनी दूध घरी नेले. तर काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला. पण ग्रामसभेच्या निर्णयामुळे व स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झालेला असल्याचे कारण सांगून भाविकांत जागृती करण्यात आली. मनात शुद्ध विचार असेल, बोलण्यात मृदुता असेल तर कोणाचेही प्रबोधन सहज करता येते. तरुणांनी सर्वांच्या भावनांचा विचार करत. सर्वांचा मान ठेवत कार्य केले.

नम्रपणे केलेली विनंती शत्रूतही बदल घडवते. तसाच बदल आता या मंदिराच्या आवारात घडला. जणूकाय चमत्कार वाटावा असे ते वातावरण होते. जागोजागी लावण्यात आलेल्या फलकांनी मोठे प्रबोधन केले. माणसांना स्वच्छतेचे महत्त्व यातून सांगण्यात आले. स्वच्छता असेल तरच देवाची वस्ती तेथे असते. देव मंदिरात राहावेतयासाठी मनासह परिसराची स्वच्छता करा. असा संदेश वारंवार भाविकांच्या मनावर बिंबवण्यात आला. अध्यात्मात असणारे स्वच्छतेचे महत्त्व वारंवार सांगण्यात आले.

स्वच्छतेचे हे सोमवार आता नियमित सुरू झाले. गावातील इतर मंदिरातही हाच उपक्रम राबविण्यात येऊ लागला. गावातील सारी मंदिरे स्वच्छ झाली. तसा गावही स्वच्छ झाला. परिसरातील स्वच्छता पाहून येणारे पर्यटकही गावाची वाहवा करू लागले. गावाचा हा आदर्श आता इतर गावांनीही घेतला आहे.

Friday, August 5, 2016

सद्गुरु मला सांगा

सद्गुरु मला सांगा
मला सांगा मी तुमची कशी प्रार्थना करु
मला सांगा मी तुम्हाला कोणत्या नावाने पुकारु
मला सांगा मी तुम्हाला कसे ओळखू
मला सांगा मी तुम्हाला कसे पारखू
मला सांगा मी तुम्हाला कसे भेटू
सद्‌गुरु म्हणे सोपे आहे,
माझा आध्यात्मिक आत्मा तुझ्यातच पाहा

- राजेंद्र घोरपडे

आध्यात्मिक शांती

प्रोटॉन्सवर भार धन, इलेक्‍ट्रॉन्सवर भार ऋण
भाराविना न्युट्रॉन्स, या सर्वांच्या वर्तुळाचा होतो अणू
श्‍वास आतमध्ये जाताना "सो' तर बाहेर पडताना "हम'
मनाची एकाग्रता या सर्वांच्या वलयातून होते अध्यात्म
अणुच्या उर्जेतून घडवला जातायेत विघातक स्फोट
तर अध्यात्माच्या उर्जेतून आत्मज्ञानाचे पाठ
हिसाचार विज्ञानाचा,
कि शांती अध्यात्माची

- राजेंद्र घोरपडे

Tuesday, August 2, 2016

सर्वांचा आत्मा एकच

सद्गुरु म्हणे
आंबा, वड, चंदन, बाभूळ
या वृक्षांचे गुणधर्म वेगळे
आंबाच्या फळांची गोडी न्यारी,
तर थकलेल्या वाटसरुस वडाचा आधार
काटेरी बाभूळाचे कुंपण सुरक्षित
तर चंदनाच्या वासाने मिळतो आनंद जीवनात
पण या सर्व वृक्षांचा अग्नी एकसारखाच
तसे वेगवेगळी विचारसरणी माणसांची
पण त्या सर्वांचा आत्मा मात्र एक सारखाच
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

Monday, June 27, 2016

सावध रे सावध

सावध रे सावध
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।
एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ।।
आज संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरकडे रवाना होत आहेत. ग्यानबा तुकारामाच्या गजराने पुणे जिल्ह्याचा परिसर दुमदुमुन निघतो. अध्यात्माच्या प्रगतीसाठी निघालेले वारकरी एकमेकाला सावध करत पुढे चालत असतात. जा मार्गावरुन ही दिंडी निघते त्या मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांनारेही या अध्यात्माच्या गजराने सावध होतात. पालखीचा हा सोहळा पाहून रस्त्याने जाणारा वाटसरूही त्याचे दुःख विसरतो. त्याच्यातील दुष्टभाव नाहीसा होऊन त्याच्या विचारात चांगुलपणाचा अंकुर फुटतो. इतके सामर्थ या पालखीच्या दर्शनाने होते. सर्वत्र प्रसन्नता, आनंद या वारी मार्गावर ओसंडून वाहात असतो. या प्रसन्नतेला येणारा-जाणारा वाटसरुही सावध होतो. त्याच्या मनालाही प्रसन्नता लाभते. नकळत त्याच्यातही बदल होतो. हा बदल त्याला जरी जाणवत नसला तरी त्याचे महत्त्व तो अनुभवत असतो. ही अनुभूती त्याला येत असते. फक्त त्याचे अवधान त्याने जागृत ठेवायला हवे. वारीची दृष्ये पाहणारेही या जयघोषाने प्रसन्न होऊन जातात. संतांच्या या आनंदाच्या डोहात आपणही डुंबायला हवे. वारीच्या या निमित्ताने आता आपणही सावध होऊ या. अध्यात्मात सावधानतेला महत्त्व आहे. युद्धाच्याक्षणी सैनिक एकमेकाला सावध करतात. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी एकमेक सावध होत पुढे वाटचाल करतात. तसा आपणही सावध होत आपल्या शरीरातील अवयवांना सावध करत साधनेसाठी सज्ज व्हायला हवे. तन-मनास सावध करुन साधनेवर लक्ष केंद्रित करायला हवे. वारीतून तनाला आणि मनाला मिळणारी प्रसन्नता साठवून त्याचा वर्षभर उपयोग करायला हवा. पावसाळा चारच महिन्यांचा असतो. पण आता तर तो एक-दीड महिनाच पडतो. पावसाळ्यात पडणारे पाणी उन्हाळ्यात आपणास उपयोगी पडावे यासाठी आपण ते साठवून ठेवतो. धरणे, तलाव, पाणलोट विकास हा यासाठीच केला आहे. भूजलाच्या पातळीतही वाढ व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. भूगर्भाचे पुर्नभरण आपण करत आहोत. जणेकरुन उन्हाळ्यातही आपणस पाणी कमी पडू नये. तसे वारीचे हे दहा-बारा दिवस आनंद-प्रसन्नतेचा असतात. ही प्रसन्नता आपण साठवून ठेवायला हवी. याचा वापर वर्षभर करायला हवा. उर्जेचा गुणधर्म आहे. उर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. उर्जा एका स्थितीतून दुसऱ्यास्थितीत जाऊ शकते. वारीतील उर्जा वर्षभर पुरावी यासाठी ती दुसऱ्यास्थितीत साठवायला हवी. ती आपल्या शरीरात साठवायला हवी. तनात मनात ती उर्जा कायम राहायला हवी. ही उर्जा साठवण्यासाठी आपण सावध व्हायला हवे. तनाला मनाला सावध करायला हवे. वर्षभर येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मनाला खंबीरपणे उभे राहण्याचे सामर्थ मिळावे यासाठी ही उर्जा साठवायला हवी. यासाठीच वारीच्या प्रसन्न वातावरणात डुंबायला हवे. मन मोकळेपणाने त्यात सहभागी व्हायला हवे.

Saturday, June 4, 2016

अक्षर

तें अक्षर जी अव्यक्त । निर्देशदेशरहित ।
सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ।। 32 ।। अध्याय 12 वा


सोऽहं हे अक्षर आहे तरी काय? सोऽहं हा स्वर आहे. आपण श्‍वास आत घेतो तेव्हा सो तर श्‍वास बाहेर सोडतो तेव्हा हम्‌ हा स्वर उत्पन्न होतो. श्‍वास आत बाहेर घेण्याची ही क्रिया म्हणजे सोऽहम्‌. साधनेत हेच तर करायचे असते. श्‍वास आत बाहेर घेण्याच्या या क्रियेवर मन केंद्रित करायचे असते. मन या स्वरात मिसळायचे असते. सोऽहं हे अक्षर असे आहे. आपला जन्म होतो तेव्हापासून ते आपला मृत्यू होईपर्यंत हाच तर जप सुरू असतो. समस्त जिवांचा हाच तर प्राण आहे. यासाठीच समस्त जिवात मी सामावलो आहे. मी म्हणजे हा सोऽहं सामावला आहे. प्रत्येक मानवामध्ये तो आहे. हा सोऽहं जो आत्मा आहे. तो या शरीरात आला आहे. जन्म झाल्यानंतर तो शरीरात येतो. मृत्यू पावल्यानंतर तो शरीरातून जातो. देहात आला असल्याने आपण त्याला नाव देतो. पण प्रत्येकाच्या देहात तो आहे. या देहात वेगळा, त्या देहात देहात वेगळा असा भेदभाव नाही. त्याला मरण नाही. तो अमर आहे. अविनाशी आहे. इंद्रियात येतो पण इंद्रियापासून तो वेगळा आहे. सोऽहं हा स्वर आहे त्यामुळे तो दिसत नाही. पण तो कानाने ऐकायचा असतो. मन त्याच्यावर नियंत्रित करायचे असते. डोळ्यांची नजर त्याच्यावर केंद्रित करायची असते. त्याला वास नाही, गंध नाही त्यामुळे त्याची जाणीव ही स्वरांनीच अनुभवायची असते. आपण म्हणजे कोण आहोत ? आपणाला नाव आहे पण ते आपण नाही. ते देहाचे नाव आहे. मग आपले खरे स्वरूप काय आहे? श्‍वास हेच आपले खरे स्वरूप आहे. आपण म्हणजे श्‍वास आहोत. श्‍वासातील स्वर सोऽहं. हे आपले खरे स्वरूप आहे. हे आपण ओळखायला हवे. ते जाणून घ्यायला हवे. ते अनुभवायला हवे. त्याची अनुभूती यायला हवी. अनुभवातूनच अध्यात्माची खरी ओळख होते. यासाठी हा स्वर अनुभवायला हवा. आपण म्हणजे सोऽहं. ही वस्तू आहोत हे जाणून घ्यायला हवे. ज्याला हे समजले तो ज्ञानी. ज्याने याचा अनुभव घेतला तो ज्ञानस्वरुप होतो. ज्याला याचा बोध होतो तो आत्मज्ञानी होतो. अमरत्वाला पोहोचतो. कारण सोऽहं हे अक्षर अमर आहे. अविनाशी आहे. यासाठी या भावनेने सोऽहं ची साधना करायला हवी. उपासना करायला हवी. म्हणजे आपणही आत्मज्ञानी होऊ. आपणही त्याचा बोध घ्यायला शिकले पाहिजे. हेच अध्यात्म आहे. अध्यात्म हे याच अक्षरात सामावले आहे. या अक्षरातच सर्व विश्‍व सामावले आहे. यामुळेच या विश्‍वस्वरुप अक्षराची उपासना करायला हवी. सर्व सचिवांची अनुभूती या अक्षरातून घ्यायला हवी.