Monday, August 29, 2016

अभिषेकाचे पुण्य....

अनेक मंदिरात मुर्तींना अभिषेक केले जातात. पण या अभिषेकात वापरले जाणारे दुध वायाच जाण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. हे दुध वाहत जाऊन सांडपाण्यात मिसळते इतके भानही लोकांना राहात नाही. तरीही भावनेपोटी हे अभिषेक सुरुच असतात. अशा या प्रथांना कोठेतरी आळा बसायला हवा. काही मंदिरात तर हजारो लिटर दुध असेच वाया जाते. ही प्रथा थांबवण्याचा वसा बेळगावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. गेले दोन वर्षे कपिलेश्‍वर मंदिरात श्रावणातील सोमवारी होणारे अभिषेक या कार्यकर्त्यांनी  रोखले आहेत. हे वाया जाणारे दुध त्यांनी अनाथ व वृद्धा आश्रमांना देऊन एक वेगळा आदर्श उभा केला आहे.

आता मला विचाराल तर आम्हा नव्यापिढीला अभिषेक कोणी सुरु केला याची कल्पनाही नाही. तो का केला जातो हे ही माहीत नाही. ते जाणून घेण्याचीही आमची इच्छा नाही. केवळ परंपरा म्हणून अभिषेक करण्याकडेच आमचा कल दिसतो. पूर्वज सांगतात म्हणून श्रद्धेपोटीच आपण अभिषेक करतो. यात त्या मुर्तीची झिज होते याचे भानही राहात नाही. हा अभिषेक दिवसातून एकदाच करावा याचेही भान नसते. दगडीमुर्तीला देव मानायचे मग त्या दगडावर दुध ओतून ओतून त्याचे सोैदर्य नष्ट होते. हे आपल्या लक्षात कसे येत नाही. देवाचे सौदर्य नष्ट होत असेल तर मग ती पुजा कशी आपणास मान्य होते हेच मुळात समजत नाही. तरीही आपण अभिषेक करतच राहातो. अशा अभिषेकाने कित्येक मंदिरात दुर्गंधीही पसरते. याकडे कोणाचेही लक्ष नसते. हीच देवाची भक्ती का? नव्या पिढीला भक्ती म्हणजे काय याचीही माहिती नसल्याने ही परंपरा म्हणून आपण अंधश्रद्धा जोपासतो आहोत. याबाबत आता प्रबोधनाची गरज आहे. संतांनी भक्ती कशी करावी ? श्रद्धा म्हणजे काय ? पुजा कोणाची होते ? पुजेसाठी काय हवे असते ? हे सर्व सांगितले आहे. पण तरीही आपण याचा अभ्यास करत नाही. विचार करत नाही. मग चुका या होणारच. पण त्या चुका आहेत हे ही आपण मान्य करायला तयार नाही. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. पण तरीही जनता मात्र याबाबत अज्ञानी कशी ? भोळीभाबडी जनता अशा अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडते. विज्ञान प्रगत झाले पण लोकांच्या भाबडेपणाचा फायदा उठवणारे काही कमी राहीले नाहीत. त्यांनी या प्रगत तंत्राने लोकांची फसवणूक केली जात आहे. फसवणूकही आता हायटेक झाली आहे. आपण फसत आहोत याचेही भान आता जनतेला राहीले नाही. पण काही जागरुक माणसे सामाजिक भान ठेऊन कार्य करत आहेत. समाजाला दिशा देण्यासाठी अशा व्यक्तींची गरज आहे.

कपिलेश्‍वर हे बेळगाव शहरातील प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी देवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे. हजारो लोक दुधाच्या पिशव्या घेऊन या मंदिरात अभिषेक करत होते. पण हे सर्व दुध गटारीत मिसळले जायचे. दुधाची ही नासाडी रोखण्याचा संकल्प नांदुर गल्लीतील मंडळांनी घेतला. देवस्थांनचे पुजारी व विश्‍वस्थांना विश्‍वासात घेऊन त्यांनी दुधाची नासाडी थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. दैनिक सकाळनेही या उपक्रमाचे स्वागत करत जनजागृतीसाठी मंडळास सहकार्य केले. दुधाचा अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना विश्‍वासात घेऊन येणारे दुध संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतला. गेली दोन वर्षे हे कार्य सुरु आहे. शेकडो लिटर वाया जाणारे दुध संकलीत करून अनाथ व वृद्धाश्रमात ते वाटण्यात येत आहे. खरी भक्ती कोणती? खरा धर्म कोणता ? खरे पुण्य कशात आहे ? हे आता जनतेनेच ठरवायला हवे आणि कृती करायला हवी. भक्तीचा खरा अर्थ समजून कृती करायला हवी. बेळगावचा हा उपक्रम देशातील अनेक मंदिरात राबविता येणे शक्‍य आहे. याबाबत जागृतीही करता येणे शक्‍य आहे. अभिषेकाचे पुण्य कशाने मिळेल हे जनतेने समजून घेऊन आता कृती करायला हवी. यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

देवस्थानच्या परिसरात असे अनेक उपक्रम राबविण्याची आता गरज आहे. अनेक मंदिरात देवळात नारळ फोडले जातात. या नारळातील गोड पाणी शिंपडण्यात येते. पाण्याचे पवित्र विचारात घेऊन कार्य करायला हवे. हे पाणी कोणाच्या तरी पोटात गेल्यास त्याला उर्जा मिळेल. हा विचार का केला जात नाही. एखाद्या आजारी व्यक्तीला हे पाणी दिले तर त्याचा आधार मिळेल. हा विचार का केला जात नाही. यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा देवस्थानाने उभारायला हवी. अशा विचार का केला जात नाही. दैनिक सकाळच्या तनिष्का गटाने जोतिबा डोंगरावर हा उपक्रम राबविला. त्याला प्रतिसादही मिळाला. नारळाचे वाया जाणारे पाणी साठवून ते शाळा व रुग्णांना ताबडतोब दिले. या उपक्रमाचे कौतुक झाले. अशा या उपक्रमातून देवस्थानात होणारी स्वच्छताही राखली जाते याचा विचार व्हायला हवा.

पुण्य कर्म कोणते हे आता जनतेनेच ओळखायला हवे. तशी कृती करायला हवी. खरी भक्ती कोणती ? खरे अध्यात्म कशात आहे ? देव कोठे आहे ? याचा अभ्यास करुन कृती करायला हवे. हे जाणून घेऊन आपला आचरण करायला हवे. ही जागृती आली तर श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे सांगण्याची गरज भासणार नाही.

- राजेंद्र घोरपडे, 

Tuesday, August 23, 2016

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे...

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे... 
अभ्यासकांची भावना; अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाच्या विविध रूपांची छाप

- राजेंद्र घोरपडे


कृष्ण विविध रूपात पाहायला मिळतो. प्रेममय, भक्तिमय, खोडकर असे त्याचे व्यक्तिमत्त्व जनसामान्यांना आपलेसे वाटते. वात्सल्य, शृंगार, भक्ती, करुणा अशा रसांचा आविष्कार कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात आहे. प्रेम म्हणजे भक्ती या जाणिवेतून त्याच्यावर काव्य रचना झाल्या. संतांनी विठ्ठल रूपात कृष्णाचे वर्णन केले आहे. कारण पंढरीच्या विठ्ठलात शिव आणि विष्णू अशा दोन्ही तत्त्वांची एकरूपता संतांनी पाहिली आहे. असा हा कृष्ण संत साहित्य अभ्यासकांना कसा वाटतो याविषयी... 


श्रीकृष्ण हे अष्टावधान व्यक्तिमत्त्व आहे. राजनैतिक, युद्धकुशल, चतुरंग योद्धा असा तो आहे. प्रसंगी आपल्या मूल्यांसाठी, स्नेहासाठी तो सारथ्यही पत्करतो. बालवयात तो निरागस खोडकर वाटतो. तारुण्यात तो प्रेमभक्तीत रंगलेला असा वाटतो. त्यानंतर चतुरस्र नेतृत्व करणारे असे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. संतांनी कृष्णाचे विविध पैलू मांडले आहेत. संत नामदेवांचा कृष्ण निरागस, निर्मळ असा आहे. संत एकनाथांनी रंगवलेला कृष्ण बालक्रीडेत रममाण झालेला आहे. तो रोमॅन्टिकही वाटतो. संत तुकारामांनी कृष्णाच्या बालक्रीडेवर अभंग रचले. त्यांच्या अभंगातून तो भक्तीचे दैवत म्हणून पाहायला मिळतो. पंडित कवींनी लोकांचे रंजन करणारा, चांगल्या मूल्यांची जपणूक करणारा कृष्ण रंगवला आहे. शाहिरांनी शृंगारप्रधान असे त्याचे चित्र उभे केले आहे. एकूणच कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे.
- ल. रा. नसिराबादकर, 
संत साहित्याचे अभ्यासक 

भगवद्‌गीतेतील कृष्ण कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी असा तीन प्रकारचा आहे. अर्जुनाला शिकवण्याचे केवळ निमित्त आहे. त्यामुळे आजच्या जीवनातही त्यातील तत्त्वज्ञान लागू पडते. या तीन गोष्टींनी जीवन आनंदी होते. कर्माच्या मोबदल्यात काय मिळाले याचाच विचार होतो. ते आवश्‍यक असले तरी सध्याच्या पिढीला कर्म करण्याआधीच फळ हवे आहे. श्रद्धेने कर्म केले तर यश जरूर मिळते. परमार्थ करताना व्यवहार ज्ञानही आवश्‍यक आहे. याची सांगड घातली तरच प्रपंच सफल होतो.
यशवंत पाठक, 
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

भगवद्‌गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेला ग्रंथ आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. भगवद्‌गीता कृष्णाने सांगितलीच नाही, असे म्हणणारेही लोक आहेत. पण हिंदू धर्मात तीन ग्रंथ पवित्र मानले जातात. त्यात भगवद्‌गीतेचा समावेश आहे. कृष्णाचे जगणे हे भगवद्‌गीतेसारखे आहे. यासाठी भगवद्‌गीता समजल्याशिवाय कृष्ण चरित्र समजत नाही व कृष्ण चरित्र समजल्याशिवाय भगवद्‌गीताही समजत नाही.
डॉ. सदानंद मोरे, 
संत साहित्याचे गाढे अभ्यासक 

Sunday, August 21, 2016

मन करा रे प्रसन्न

ज्याने मन जिंकले
त्याचे मन हे उत्तम दोस्त झाले
ज्याने मनाकडून पराभव स्विकारला
त्याचा सर्वात मोठा शत्रू मन हाच झाला

हा मनाचा नियम आहे
यासाठी मनाला नियंत्रित करायचे आहे
मनावर विजय मिळवायचा आहे
मनावर आपल्या ताब्यात ठेवायाचे आहे

मनाला शांती आवडते
तेव्हा मनाला प्रसन्नता येते
मनाला अशांती आवडते
तेव्हा मन हिंसावादी होते

मनाचे हे शास्त्र समजून घ्यायला हवे
त्यासाठी मनाला नियंत्रणात ठेवायला हवे
लोभ, वासनेपासून मन दुर ठेवायला हवे
मन आपल्या ताब्यात यायला हवे

मन करा रे विचार मुक्त
विचार थांबले की व्हाल मुक्त
मग करा एकचाच स्वीकार
सो हम सो हम चा करा गरज

मनाला लाभेल अखंड प्रसन्नता
मनाला लाभेल अखंड शांतता
मन लागेल वेड अध्यात्माचे
मग फुलेले मन आत्मज्ञानाचे

- राजेंद्र घोरपडे

Saturday, August 20, 2016

सावर रे मना...

मन चपळ, चपळ
मन चंचल, चंचल

न राही एके जागी
फिरे सारखे जागो जागी

या मना कसे आवरु
अगणिक विचारांना कसे सावरु

वाऱ्याला रोखू झाडे लावून
प्रकाशाला रोखू भींती उभारुन

सर्वांना आहे विश्रांती
पण मनाला नाही ऊसंत

सतत धावे इकडे तिकडे
सतत राहे भटकत जिकडे तिकडे

एकाग्रतेने कर सोहम सोहम ध्यान
मन त्यावर कर स्थिर होईल मग आत्मज्ञान

- राजेंद्र घोरपडे

Thursday, August 11, 2016

आमदारांना पगारवाढीच्या अनोख्या शुभेच्छा

आमदारांना पगारवाढ झाली पण देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत काही वाढली नाही. उसाचा दर काही वाढला नाही. शेतकरी नेते केवळ आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करतात. स्वतःचे नाव कमावतात. खासदारकी-आमदारकीही मिळवतात. मंत्रिही होतात आणि शेतकऱ्यांना विसरतात अशी काहीशी परिस्थिती सध्या तरी आहे. शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या उसाला भाव मिळाला. कोणीतरी बोलणारे आहे. म्हणून शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. या विश्वासांचा त्यांनी मान राखायला हवा. हे बोलण्याचा उद्देश याचसाठी कारण पर्वाच आमदारांची पगारवाढ झाली. या आमदारांचे काही शेतकऱ्यांनी अनोखे अभिनंदन केले. असाच एक फ्लेक्स वाचणात आला. त्यावर शुभेच्छुकांची नाव वाचली आणि डोळे उघडले. शुभेच्छुस होते. कपाशीवरील लाल्या रोग अनुदान वंचित शेतकरी, मोसंबी अनुदान वंचित शेतकरी, महागाईने होरपळलेला शेतकरी वर्ग, रंजले गांजलेले सर्व सामान्य शेतकरी. आपणास मिळाले नाही म्हणून काय झाले दुसऱ्याला मिळाले आहे ना. याच भावनेने त्यांनी या आमदारांना शुभेच्छा दिल्या आहेत. अहो आम्हाला मिळाले नाही याचे दुःख नाही पण दुसऱ्याला मिळाले म्हणून आम्हाला जळायचे नाही. त्यांना मिळाले त्यांचा मान राखायला हवा. शेतकऱ्यांच्या या स्वभावाचा विचार करायला हवा. अहो महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी मुठीत घेतलेले मीठ टाकले नाही. वाट्टेल तेवढा मार बसला तरी त्याला प्रतिकार केला नाही. उलट वार केला नाही. उ की चुही केले नाही. अशा या गांधी वादाचा शेतकऱ्यांवर प्रभाव आहे. कितीही अत्याचार झाला तरी तो सहन करायचा पण या सहनशक्तीचा अंत राजकर्त्यांनी पाहू नये कारण इंग्रजही देश सोडून गेले. तसे तु्म्हालाही सत्ता सोडावी लागेल प्रसंगी देशही सोडावा लागेल याचे भान त्यांनी ठेवायला हवे. शेतकरी गप्प आहे सोसतो आहे याचा अर्थ असा नव्हे की तो काहीच करणार नाही. हिसेंचा मार्ग कधीही घातक आहे. तो शेतकरी स्वीकारणार नाही. पण तुम्हाला पाय उतार करण्यासाठी योग्य मार्ग मात्र तो निश्चित स्वीकारतो याचा विचार करायला हवा. केवळ आश्वासने देऊन आता भागणार नाही. शेतकऱ्यांचे आपण काहीतरी देणे लागतो याचा विचार करुन राजकर्त्यांनी काम करायला हवे. पगारवाढ घेताना शेतकऱ्यांचा विचार आपण करायला हवा होता. ही पगारवाढ स्वीकारताना शेतकऱ्यास विसरू नका ऐवढेच येथे मला सांगावेसे वाटते.
राजेंद्र घोरपडे

आली आषाढी आषाढी

आली आषाढी आषाढी
जडली भाव भक्तीची कडी

दुमदुमु लागला विठ्ठल विठ्ठलाचा नाद
वारी वाटेवर गुंफला नामजपाचा निनाद

पावसाच्या सरींनी केले साफ मन
शुद्ध भक्तीची बीजे रोवली ध्यानात

नाभी एकवटली, टक स्थिरावली भूस्थानी,
कुंडलीनी झाली जागृत, झाले विठ्ठलाचे दर्शन

राजेंद्र घोरपडे,

Sunday, August 7, 2016

साने गुरुजींचे स्वातंत्र्य विचार

सहज साधनाची वेबसाईट चाळताना मला साधनेच्या पहिल्या अंकातील साने गुरुजींचा लेख वाचनात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून एक वर्ष झाल्यानंतर साधना साप्ताहिकाचा जन्म झाला. पहिल्या स्वातंत्र्यदिनीच पहिलाच अंक प्रकाशित केल्यामुळे साहजिकच देशाच्या स्वातंत्र्यावर यामध्ये संपादकीय लेख आहे. साने गुरुजींनी स्वातंत्र्य म्हणजे काय याचा विचार यामध्ये मांडला आहे. पण भारताला स्वातंत्र्य मिळूण सत्तरी गाठली तरी आपण साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य आणू शकलो नाही याची खंत वाटते.

स्वातंत्र्य म्हणजे संधी असे साने गुरुजी म्हणतात. विकासाची संधी प्रत्येकाला देण्यात यावी असे त्यांना वाटत होते. प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार द्यायला हवा. पण त्यांचा विचारातील संधी मिळू शकली नाही. सज्जन विचार नांदावेत असे त्यांना मनोमन वाटत होते. पण तसे घडले नाही. स्वातंत्र्य मिळाले फक्त इंग्रजी राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली. इतकाच बदल झाला. सत्ता बदलच झाला. फक्त व्यक्ती बदल झाला. असेच म्हणावे लागेल. लाच घेण्याचे प्रकार वाढले. राजकिय नेत्यांची मनमानी वाढली. कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा. पण तसे घडले नाही. राजकत्यांच्या अरेरावीने हळूहळू स्वकियांची राजवट परकिय वाटू लागली. साने गुरुजींनी रामराज्याचे स्वप्न पाहिले होते. सध्या देशात सत्तेत असणाऱ्या सरकारनेही रामराज्य आणण्याची स्वप्ने आपणास दाखवली होती. रामाचे राज्य आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरुही असतील. पण ते त्यांच्यासाठीच एक आव्हान उभे राहीले आहे. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. त्यासाठी प्राणांची आहुती गेली तरी चालेल. विचार कधी मरत नाहीत. तो विचार जोपासणारे कोणी तरी उभे राहतेच. अखेर सत्याचाच विजय होतो. यासाठी लढत राहायला हवे. विचारांची चळवळ कधी संपत नाही. संधी देण्याचा विचार साने गुरुजींनी मांडला. पण संधीसाधूंचेच राज्य येथे आले. सध्या तर चांगल्या व्यक्तींनी राजकारणाची पायरीही चढू नये अशी स्थिती आहे. यावरुन संधी कोणाला मिळाली हे सांगण्याची मला येथे गरज वाटत नाही. पण स्वातंत्र्य म्हणजे संधी हा साने गुरुजींचा विचार लक्षात घेऊन मोदी सरकारने काम केल्यास रामराज्य आणणे शक्‍य आहे.

विकासाच्या संधी देऊन अहिंसक विचारांनी सरकारने काम केल्यास स्वातंत्र्यानंतर पाहिलेली स्वप्ने सत्यात आणणे शक्‍य आहे. सध्या आर्थिक दरी वाढली आहे. गरीब गरीबच होत आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होताना पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती सरकारने विचारात घेऊन पाऊले उचलायला हवीत. वाढती आर्थिक दरी देशासाठी घातक आहे याचा विचार करुन समानता आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल याचा विचार आता सरकारने करायला हवा. त्यावर चिंतन करायला हवे.
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी असेही साने गुरुजी म्हणतात. सरकारने आर्थिक समानता आणण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवे. लोकमानस ओळखून कामे करायला हवीत. भाषिक वाद वाढत आहेत. प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते. ती टिकवण्यासाठी त्याची धडपड सुरु असते. हा विचार करुन भाषेचे स्वातंत्र्य त्यांना द्यायला हवे. भाषेतून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलायला हवीत. विशेषतः सीमा भागात हा प्रश्‍न प्रकर्षाने जाणवत आहे. पण जनतेनेही संयम ठेऊन व्यवहार करायला हवेत. उगाच खोटी प्रतिष्ठा बाळगूण दुसऱ्यांना त्रास देणे योग्य होणार नाही. विकासासाठी राज्याचे तुकडे करणेही योग्य नाही. तुकडे केल्याने विकास साधता येईलही पण ते तुकडे एकमेकांशी भांडत राहतात याचाही विचार करायला हवा. एकत्र कुटूंब विभक्त झाले तर प्रत्येकाचा विकास होतो असे वाटते खरे पण विभक्त झाल्यानंतर विकासाच्या स्पर्धेतून वादही होतात. या वादातून नुकसानच अधिक होते याचाही विचार व्हायला हवा. भाऊ भावाचा खून करत आहे. राज्याचे तुकडे केल्यानंतर हे तुकडे एकमेकांशी भांडत राहणार याचाही विचार व्हायला हवा. सीमेचे वाद होतात, इंच इंच जमिनीसाठी वाद होतात. नोकरी, व्यवसायासाठी वाद होतात. लुट, हाणामाऱ्या वाढतात यातून विकास तो काय साधला जाणार हे ही विचारात घ्यायला हवे. यासाठी जबाबदारीने योग्य ती पाऊले उचलायला हवीत.

साने गुरुजींना स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे; स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, नैतिक भावना. असे वाटते. पण असा सतविचार घेऊन आपल्या देशातील कोणतेच सरकार आत्तापर्यंत काम करताना दिसले नाही. इतका सज्जनपणा दाखवणेही कोणाला जमले नाही. सज्जनपणाचे ढोंग करुन लुटारुंचे राज्य आपल्या देशात आले. चंगळवादाने देशाला पोखरले. मग याला स्वराज्य कसे म्हणायचे हाच मोठा प्रश्‍न आहे. कायदा कोणासाठी आहे हेच समजत नाही. राजकर्त्ये कायदा हातात घेऊन कामे करत आहेत. अशाने देशात शांती नांदेल असे कधीही शक्‍य नाही. पण स्वराज्यात सुराज्य आणणे शक्‍य आहे. हा विचार ठेऊन कामे केल्यास विषमता दुर करणे शक्‍य आहे. दुरावलेली मनेही जवळ आणणे शक्‍य होणार आहे. हा बदल केवळ समाजच घडवू शकतो. समाज विघातक कृत्ये करणारे एक टक्केही लोक नाहीत. सर्वच राज्यकर्त्ये वाईट आहेत असेही नाही. यासाठी समाजातील दहा टक्के लोकांनी एकत्र येऊन या एक टक्के लोकांना ताब्यात ठेवल्यास देशात रामराज्य आणणे शक्‍य आहे. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सरकार अशा संस्थांचा आवाज दाबत असेल तर त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही याचाही विचार व्हायला हवा. समाजाने अशांना धडा शिकवण्याची गरज आहे. पण आता कोण आवाज उठवणार. कोण चळवळ उभारणार. हे ही तिककेच महत्त्वाचे आहे. पण चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम सुरु केल्यास हे अशक्‍य नाही हे ही तितकेच खरे आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य देशात कसे नांदवता येईल याचा आता विचार होण्याची गरज वाटते.

- राजेंद्र घोरपडे