उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात येणार चंद्रकुमार नलगे पुरस्काराचे वितरण
रविवारी (ता. 12) स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशी झाले.
इये मराठीचिये नगरी या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला. चंद्रकुमार नलगे यांच्या
हस्ते निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले.
माझ्या आयुष्यात असा पुरस्कार मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. नवोदित लेखकांना अशा
पुरस्कारातून निश्चितच प्रोत्साहन मिळते. पुस्तक लिहीणे तसे सोपे वाटते पण पुस्तक
प्रकाशित करणे यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. सद्गुरूंच्या कृपार्शिवादाने एका
वर्षात माझी दोन पुस्तके झाली. पुढच्या पुस्तकांचेही नियोजन आहे. श्री ज्ञानेश्वर
माऊलीच ही सेवा करुन घेत आहेत. लिहीत रहा लिहीत रहा. आपोआप पाहिजे त्या गोष्टी मिळत
राहतील चिंता करू नकोस असा आर्शिवाद लाभत गेल्यानेच प्रोत्साहन मिळत गेले. आता या
पुरस्कारामुळे तर ही श्रद्धा दृढ होत आहे. आधार देणारी माणसे भेटली की थोड हायसे
वाटते. या पुरस्काराने कोणीतही आधार देणारे आहे असा विश्वास उत्पन्न झाला आहे.
सध्या मराठी भाषेची पिछेहाट होते आहे असे म्हटले जाते. काही अंशी हे खरेही आहे. पण
या भाषेत लिहीले जाणारे साहित्य वाचले जाते. त्याचे संवर्धन करण्यासाठी झटणाऱ्या
व्यक्तिही आहेत. उजळाईवाडी येथील हे ग्रंथालय हे त्याचाच एक भाग आहे. या
ग्रंथालयाने जोपासलेली ही चळवळ निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात अशी चळवळ
उभी करणे तितके सोपे नाही. गेली आठ वर्षे सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
राज्यभरातून लेखकांची मादिआळी येथे जमते. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी यातून निश्चितच प्रयत्न केला जातो. शासनाचाही यामध्ये
सहभाग कौतुकास्पदच आहे. असे उपक्रम राबविणाऱ्या संस्थांची, साहित्यिकांची गरज आहे.
असे कार्य करणारे, तळमळीने झटणारे साहित्यिकही फारच थोडे आहेत. पण त्यांच्या या
कार्याला सहकार्य, प्रोत्साहानाची गरज आहे.
No comments:
Post a Comment